बारामती दर्पण प्रतिनिधी
पुणे :
शहरातील हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आलं आहे. त्यामुळे, टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं की काय, अशा अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत होते. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे (Pune) शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना काल (बुधवारी, ता-20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 14 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. सुदैवाने 10 प्रवासी बचावले आहेत.
हिंजवडी फेज वनमध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याने चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं ट्रॅव्हल्समधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे. ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे, चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी अन 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
बस कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना अचानकपणे चालकाच्या पायाखाली आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार लॉक झाले, ते न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे अगोदर सांगण्यात येत होते. मात्र, आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.
Post a Comment