बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक :
डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, बारामती येथील सात विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत थोपटेवाडी येथे आगमन झाले असून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शेतीतील वाढता वापर, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, माती परीक्षणाची आवश्यकता तसेच आधुनिक शेती पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत कशी करता येईल, याविषयी जनजागृती करण्यात आली.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे सात विद्यार्थी पुढील तीन महिने थोपटेवाडी येथे वास्तव्यास राहणार असून या कालावधीत ते शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद साधणार आहेत. तसेच शेतीविषयक विविध माहितीची देवाणघेवाण, पिकांचे निरीक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याचे काम करणार आहेत.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत आपल्या शेतामध्ये घेत असलेल्या विविध पिकांचे प्रात्यक्षिक (डेमो) घेण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. विद्यार्थ्यांनीही शेतभेटीद्वारे प्रत्यक्ष शेतीचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याची तयारी दर्शविली. या उपक्रमामुळे शेतकरी आणि कृषी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व अनुभवाची प्रभावी देवाणघेवाण होऊन आधुनिक शेतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Post a Comment