बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक
कोऱ्हाळे बुद्रुक येथील भगत कुटुंबीय फक्त समाजकारण आणि राजकारण करत नाही तर उत्तम शेती सुद्धा करतात असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती दौऱ्यावर असताना कोऱ्हाळे बुद्रुक येथील भगत कुटुंबीयांच्या श्रीराम शेती फर्मला भेट दिली यावेळी ते बोलत होते. भगत कुटुंबीयांनी ऊस शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले आहेत याविषयी अजित पवार यांनी बांधावर जात या प्रयोगाची सविस्तर माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांनीही प्रथम शेतीला प्राधान्य दिले पाहिजे आणि नंतर बाकी राजकारणाच्या गप्पा मारल्या पाहिजेत. मला पण शेती करायला खूप आवडते मात्र कुठून अवदसा सुचली आणि मी राजकारणात आलो अशी खंतही पवार यांनी यावेळी व्यक्त केली. भगत कुटुंबीयांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला मागील वर्षी सर्वात जास्त ५ हजार २०० टन ऊस तसेच तालुक्यातून सर्वात जास्त भुसार मालाचा पुरवठा केल्याची आठवण सुद्धा पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना करून दिली.
शेतकऱ्यांनी आधी शेतीला प्राधान्य द्या, उगीच अजित पवार यांनी राजकारणात असा कसा निर्णय घेतला याची चर्चा करत बसू नका, मी गेली अनेक वर्ष राजकारण करत आहे. मी घेतलेल्या निर्णयामुळे बारामती तालुक्याला फायदाच झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. आजारपणाचे कारण देत राजकीय परिस्थितीपासून मी कधीच लांब जात नाही तर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा माझा स्वभाव आहे असंही पवार यांनी यावेळी सांगितले, यावेळी बन्सीलाल भगत , विलास भगत, संजय भगत, सुनील भगत, डॉक्टर यशवंत भगत यांच्यासह संपूर्ण भगत कुटुंबीय व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील भगत यांनी केले तर आभार विलास भगत यांनी मानले.
Post a Comment