बारामती (दि२०)- हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून खंडणी मागणार्‍या टोळी विरुद्ध बारामतीत मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर टोळीने बारामती शहर व परिसरात खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी अशा स्वरूपाचे १३ गुन्हे संघटिपणे केल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. नितिन बाळासो तांबे (रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे), अमिन दिलावर इनामदार (रा.कसबा बारामती जि.पुणे), गणेश संजय बोडरे (रा.बारामती ता. बारामती जि. पुणे) व अनोळखी २ इसम यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
घटनेची हकीकत अशी की,फिर्यादी हे बारामती शहरातील फलटण रोडवरील त्यांच्या स्नेहा गार्डन या हॉटेलवर असताना वरील आरोपी हॉटेलमध्ये आले. व नितीन तांबे हा फिर्यादीस म्हणाला की 'मी एन टी भाई आहे. तु मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबंध आहेत. तुला हॉटेल निट चालवायचे असेल तर दर महिन्याला माझा माणुस येईल. त्याचेकडे २५ हजार रूपये  दयायचे नाहीतर मी स्वत: एन. टी. भाई येईल लक्षात ठेव' असे म्हणुन दमदाटी केली.तसेच आरोपी अमिन इनामदार व इतर साथीदार फिर्यादीस म्हणाले की, एन.टी.भाईचे संबध लांब पर्यंत आहेत. तु जर आमच्यावर गुन्हा दाखल केला.तर आम्ही जेलमध्ये बसु व जेल मधुन तुझा गेम करू' अशी धमकी दिली. तसेच सदर आरोपींनी हॉटेलमधील दारूच्या बाटल्या जबरदस्तीने घेऊन हॉटेलमध्येच पित बसले. दरम्यान आरोपींपैकी एका अनोळखी इसमाने फिर्यादी जवळ येत म्हणाला की तुला असाच त्रास होईल तू शहाणा हो एन.टी. भाईला त्याने सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला पंचवीस हजार रुपये हप्ता दे,नाहीतर तुला असाच त्रास कायम त्रास होईल. त्यानंतर आरोपी नितीन तांबे फिर्यादीस म्हणाला की 'तुला लय माज आलाय, मी आताच मोक्का तोडुन जेलमधुन बाहेर आलो आहे. असे म्हणुन त्याने फिर्यादीस हाताने फाईट मारली व खिशातुन चाकु काढुन हप्ता नाही दिला.तर हॉटेल बाहेर आल्यावर तुझे तुकडे पाडु अशी धमकी दिली.आरोपी अमीन इनामदार याने धातुच्याकडे हातात घेवून फिर्यादीच्या पोटात फाईट मारली. दरम्यान साक्षीदार हे सोडवण्यास येत असताना आरोपींनी फिर्यादीस धक्काबुक्की करून हॉटेलच्या काऊंटर मधील ७ हजार २०० रूपये रोख रक्कम,हॉटेलचे लायसन्स,न्यु लिफ कंपनीचे घडयाळ असे जबरीने दरोडा टाकुन,मोटार सायकल वरून फलटण बाजुकडे निघुन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


यांनी केली कारवाई.......
सदर आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्याकडे प्रस्ताव पाठविणेत आला होता. त्यानुसार वरील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे करीत आहेत. सदरची कारवाई ही डॉ.अभिनव देशमुख,पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते,अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग बारामती,नारायणशिरगावकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती विभाग बारामती, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सपोनि मुकुंद पालवे, पोलीस अंमलदार अविनाश दराडे,अतुल जाधव,अंकुश दळवी यांनी केली.

 
बारामती उपविभागात १८ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई

सदर कारवाई बद्दल पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण यांनी १५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पदभार स्वीकारल्या पासुन १८ गुन्हेगारी टोळया विरूध्द १८ मोक्कांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यामध्ये १२० आरोपी अटक केले असुन टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post