बारामती दर्पण प्रतिनिधी :
को-हाळे बुद्रुक : शासनाच्या ई-पीक पाहणी उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी अचूकपणे करावी, यासाठी कोहाळे बुद्रुक येथे कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ‘माझी शेती – माझा सातबारा – माझी पीक नोंद’ या संकल्पनेअंतर्गत ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम Google Play Store वरून e-Peek Pahani ॲप डाउनलोड करून मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करावे. त्यानंतर जिल्हा, तालुका व गाव निवडून गट क्रमांक अथवा खाते क्रमांक निवडण्याची माहिती देण्यात आली.
पीक नोंदणी करताना पिकाचे नाव, हंगाम व पेरणीची तारीख यांसह आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर शेतात जाऊन GPS (लोकेशन) सुरू करून पिकाचा फोटो काढणे, भरलेली माहिती तपासणे आणि ती सबमिट करणे, अशा पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
ई-पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद ऑनलाइन होते. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी, पीकविषयक माहिती उपलब्ध होण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत आवश्यक मदत मिळण्यासाठी ही नोंद उपयुक्त ठरते. पीक पाहणीची प्रक्रिया पारदर्शक व जलद होण्यासही मदत होते, अशी माहिती कृषीदूतांनी दिली.
शेतकऱ्यांनी पीक पाहणी करताना शेतात जाऊनच फोटो काढावा, GPS लोकेशन सुरू ठेवावे, योग्य पीक माहिती भरावी आणि माहिती सबमिट करण्यापूर्वी ती पुन्हा तपासावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करून प्रत्यक्ष ॲपच्या माध्यमातून प्रक्रिया समजावून देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत झाली.

Post a Comment

أحدث أقدم