प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन; रस्ता खुला होईपर्यंत माघार नाही
 
बारामती दर्पण प्रतिनिधी 
कोऱ्हाळे बुद्रुक : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील गावठाणातील रोहिदासनगर (दलित वस्ती) कडे जाणारा सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता अतिक्रमण करून बंद करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समवेत जगदीप देविदास पवार आणि सचिन आनंता सोनवणे हेही उपोषणात सहभागी झाले असून परिसरातील नागरिकांनी आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शविला आहे. रस्ता खुला होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहिदासनगरकडे जाणारा हा सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता अनेक वर्षांपासून नागरिकांच्या वापरात होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिक्रमणामुळे हा मार्ग बंद झाला असून दलित वस्तीतील नागरिकांना दैनंदिन ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदने देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
रस्त्याची शासकीय मोजणी व सीमांकन पूर्ण झाले असून अतिक्रमण हटविण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्ताची रक्कमही भरलेली आहे. तरीदेखील ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण हटविण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप उपसरपंच राजेंद्र पवार यांनी केला.
दरम्यान, उपोषणस्थळी गावातील नागरिक सातत्याने भेट देत असून आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सार्वजनिक रस्ता अतिक्रमणमुक्त करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم