मोरगाव : बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील झोरेवाडी परिसरात दोन ज्येष्ठ महिलांची झोपेतच गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत महिलांची नावे इंदुबाई मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) अशी आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही महिला सोमवारी रात्री घराच्या ओसरीत झोपल्या होत्या. मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या निदर्शनास दोघींचे मृतदेह आल्याने दुहेरी हत्याकांडाचा प्रकार समोर आला.
इंदुबाई लडकत या बाबुर्डी गावच्या माजी सरपंच असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दोन्ही महिलांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.
إرسال تعليق