बारामती दर्पण प्रतिनिधी 
बारामती :

 मागील काही महिन्यांपासून राज्याचं राजकीय वातावरण बारामती लोकसभा मतदारसंघाभोवती फिरत आहे. यंदा पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाती दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी येत्या ०७ मे रोजी मतदान होत आहे. अशातच मतदानापुर्वी अजितदादांनी शरद पवार यांचं मिशन बंगल्यासमोरील मैदान मारलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा मिशन बंगल्यावर होत आहे. 
      बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या ०७ मे रोजी मतदान होत असल्याने आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत. अशातच गेल्या पन्नास वर्षांपासून शरद पवार हे बारामती मतदारसंघातील मिशन बंगल्यासमोरील मैदानावर सांगता सभा घेत होते. मात्र यावेळी हे मैदान अजित पवारांना मिळाले असून सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची सांगता सभा आता याच मैदानावर होत आहे. 
    गेल्या पन्नास वर्षापासून मग ते लोकसभा असो, कि विधानसभा असो, जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा निवडणुकांसाठी शरद पवारांची सांगता सभा मिशन बंगल्यासमोरील मैदानावर होत होती. मात्र यंदा पहिल्यांदाच शरद पवार यांची सांगता सभा बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील भागात होत आहे. त्यामुळेच मतदानापुर्वीच अजितदादांनी बारामतीचं मैदान मारलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
    दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा आतापर्यंत झाल्या आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुनेत्रा पवारांसाठी बारामतीत अनेक सभा पार पडल्या. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय होणार ? त्याचा निकाल येत्या ०४ जूनला लागणार असून त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post