बारामती दर्पण प्रतिनिधी:
बारामती : 

पवार विरुद्ध पवार अशी रंगतदार लढत होत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लासख लागलेले आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या सोशल मिडियावर 'ताई माझ्या हक्काची' या टॅगलाइनवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असतात त्याचा खरपूस समाचार घेत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ''मोठ्या ताईंचा एकेक व्हिडीओ पाहून मला हसूही येते अन् वाईटही वाटतं. सध्या त्यांची वाढलेली धावपळ आणि मानसिक संतुलन ढासळलेले पाहत आहे'','अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीका केली.
          बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.
      ''गाडीमध्ये कोणाला तरी बसवायचं, लगेच रिल्स तयार करायची, ती सोशल मिडियावर पोस्ट करायची, आणि त्याला कॅप्शन द्यायचे ताई माझ्या हक्काची. हे एकच हक्काचं काम त्यांनी केले''. सुप्रिया सुळे यांच्या कार्यअहवालात 'अजितदादां'नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा, असा प्रश्न पडतो. असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 
      यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेच्या भाषणात नाव न घेता अप्रत्यक्ष शरद पवार यांना भटकत्या आत्म्याची उपमा दिली होती. या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, साहेबांनी का जीवाला लागून घेतले आहे. पंतप्रधान मोदींनी तर कुणाचाही नाव घेतले नाही. ज्याने त्याने आपापल्या अंगाला लावून घेतले तर त्याला आम्ही काय करणार. नाव न घेताच आम्हालाच बोलले असं म्हणण चुकीचं असल्याचा टोला त्यांनी लगावला.
       तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी   शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राऊतांचे काय ऐकता. ते सर्व ज्ञानी आहेत. ते काँग्रेसच्या फडावर तुणतुण घेऊन नाचायचं काम करतात. लोकांना फसवून आर्थिक घोटाळ्यामध्ये जामिनावर सुटलेले ते आरोपी असल्याचे त्या म्हणाल्या.
     दरम्यान, शरद पवार यांनी घरातील आणि बाहेरील अशी केलेली संभावना धक्कादायक आहे. बारामतीची सूनच म्हणजे सुनेत्रा पवार याच लोकसभेत जातील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post