बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
मराठा समाजाला ओबीसी मधून ५० टक्क्याच्या आता आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण चालू केले आहे.या उपोषणाला पाठिंबा म्हणून बारामती तालुक्यातील  कोऱ्हाळे बुद्रुक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक २९ रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.या उपोषणाची सुरुवात उपस्थित महिला वैशाली दत्तात्रय भोसले, सोनाली सचिन साळुंखे, अपर्णा सचिन भोसले, अरुणा सुभाष घाडगे, साक्षी मनोज घाडगे, सोनाली विनोद नलवडे, पल्लवी सतीश घाडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.या उपोषणाला गावचे माजी उपसरपंच डी.जी.माळशिकारे , जैन व्यापारी संघटना, बौद्ध युवक संघटना को-हाळे बुद्रुक, सुनील तात्या भगत मित्र मंडळ यांच्या वतीने ही पाठिंबा देण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षण विषयी सरकारने घेतलेली ४० दिवसांची मुदत संपली असून सरकार मराठा आरक्षणाविषयी गंभीर नसल्याने आता सरकारविरोधात आंदोलनाची धाहकता वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही गावात साखळी उपोषण तर काही ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.संपूर्ण बारामती तालुक्यात सरकार विरोधात आता रोष वाढू लागला आहे. कालच्या माळेगांव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात याचा प्रत्यय आला असून आता नाही तर कधीच नाही.. असं म्हणत तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. नेत्यांनीही आता गावात न फिरता मंत्रायल,विधानभवनात बसून मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरावा अशी मागणी आता वाढू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post