बारामती दर्पण प्रतिनिधी:
बारामती:
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांनी गावागावातून साखळी उपोषण व सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना गावबंदी करावी असे आवाहन केले आहे. या आव्हानाला अनेक गावांनी प्रतिसाद दिला आहे. बारामती तालुक्यातील थोपटेवाडी, लाटे, वडगाव निंबाळकर, माळवाडी, सांगवी, उंडवडी, सुपे, मेडद अशा अनेक गावात मराठा समाजाकडून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात अजित पवार यांच्या समोर मराठा युवकांनी राडा केला होता. यानंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या मोळी पूजनाला २८ ऑक्टोबर रोजी अजित पवार यांनी येऊ नये व त्यांना बोलवू ही नये अशा आशयाचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने कारखाना प्रशासन व माळेगाव पोलिसांना देण्यात आले आहे. अजित पवार शनिवारी मोळीपूजनास आल्यास
त्यांना विरोध केला जाईल व त्यांना जाब विचारण्यात येईल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
राज्यांमध्ये मराठा समाजाचा विषय चर्चिला जात आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसाची मुदत संपलेली आहे. असे असताना सुद्धा मराठा आरक्षणावर राज्यकर्ते गंभीर नसल्याने मराठा समाज आता आक्रमक होवू लागला आहे. आता नाही तर पुन्हा कधी नाही असे म्हणत अनेक गावात सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आता शनिवारी माळेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमला अजित पवार येणार का मराठा समाजाचा रोष पाहून दांडी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Post a Comment