बारामती दर्पण प्रतिनिधी
फलटण:
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आता हळूहळू पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळ मोई, पुणे यांच्या दिंडीतील महिला वारकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार फलटण जवळील तांबमाळ या ठिकाणी घडल्यावर वारकऱ्यांनी पालखी मार्गावरच ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
पालखी सोहळ्यात अनेक दिंड्या सहभागी होत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना फलटण जवळील ताममाळ या ठिकाणी वखार महामंडळाच्या गोडाऊनचा रखवालदार आणि अज्ञात थोन इसमांनी विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळ मोई, पुणे यांच्या दिंडीतील महिला वारकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडल्याने संतप्त वारकऱ्यांनी महामंडळाच्या इमारतीचा रस्ता काटेरी फांद्या टाकून बंद केला. या कारणावरून वारकरी आणि रखवालदार विजय (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दरम्यानच आणखी एका व्यक्तीने वारकऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली व पळून गेले. यातील एकास वारकऱ्यांनी पकडून ठेवले. शिवीगाळ व दगडफेक केल्याने संतप्त वारकऱ्यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरच ठिय्या मांडला. जोपर्यंत या रखवालदारास पकडून त्यावर कारवाही करत नाही तो पर्यंत महामार्ग मोकळा करणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन केले.
या घटनेची माहीती मिळताच फलटण पोलीसांनी घटनास्थळी पोहचून वारकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतू वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जवळपास अर्धातास दोन्हीकडील वाहतूक खोळंबून वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी स्थानिक आणि पोलीसांकडून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वारकऱ्यांनी आंदोलन मागे घेत महामार्ग मोकळा केला.
إرسال تعليق