बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक नजीक असलेल्या वनविभागातील वाळलेल्या गवताला काल अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीमध्ये सुमारे दीडशे ते पावणे दोनशे एकरावरील गवत व छोटी झाडे जळून खाक झाली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
सविस्तर हकीकत अशी की, काल गुरुवार दिनांक 23 रोजी लाटे -कठीण पुल रोडच्या पूर्व व पश्चिम बाजूस अज्ञान व्यक्तीने गवताला आग लावली त्यामुळे वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने वन विभागातील अनेक ठिकाणी ही आग पसरली. वनविभागाला आग लागण्याची माहिती पत्रकार सचिन वाघ यांनी वन विभागाचे अधिकारी कोकाटे साहेब यांना कळविली. काही वेळातच कोकाटे साहेब यांच्यासह वनविभागाचे आठ ते दहा कर्मचारी औषध फवारणी पंपामध्ये पाणी घेऊन ही आग विझवण्यासाठी दाखल झाले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग वीजवण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
कोऱ्हाळे बुद्रुक व थोपटेवाडी गावच्या वेशीवर असलेल्या या वन विभागाला दरवर्षी अज्ञात व्यक्ती आग लावतात. मात्र त्यामुळे वनविभागात असलेली छोटी मोठी झाडे जळून खाक होत आहेत. काल दुपारी सुद्धा अशीच आग लावल्याने वन विभागाच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. वनरक्षक योगेश कोकाटे, वन कर्मचारी नंदलाल गायकवाड, जयराम जगताप, अविनाश नाईक, सचिन काळे, विशाल खोमणे, नवनाथ रासकर, योगेश कदम, या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातून औषध फवारणी पंपामध्ये पाणी भरून आणत ही आग आटोक्यात आणली.
वन विभागाला हा वनवा लागला नसून अज्ञान व्यक्तीने डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही आग लावली आहे. आग लावताना अशी व्यक्ती दिसल्यास स्थानिक नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधावा.
योगेश कोकाटे (वनरक्षक, वनविभाग)
Post a Comment