बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक, थोपटेवाडी येथे कार्यरत असलेल्या सिद्धेश्वर दूध संस्थेने दिवाळीनिमित्त एक रुपया वीस पैसे बोनस देऊन सर्व दूध उत्पादक सभासदांची दिवाळी गोड केली आहे.
संस्थेचे चेअरमन हेमंत विलास नलवडे यांनी पंचक्रोशीत सर्वात आधी संस्थेचा बोनस जाहीर करून सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याने दूध उत्पादकांच्या वतीने थोपटेवाडी येथे शनिवार दिनांक 15 रोजी चेअरमन यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी अमोल बालगुडे, अविरत पानसरे, नंदू जाधव, या तीन शेतकऱ्यांचा वर्षभरात सर्वाधिक दूध उत्पादन घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी विनय गाडे, अविरत पानसरे, अमोल बालगुडे, विशाल घोडे, नितीन थोपटे, गणेश सोलंनकर, आधी शेतकऱ्यांनी संस्थेबद्दल आपले मनोगत व्यक्त करत संस्थेचे आभार मानले. सत्काराला उत्तर देताना संस्थेचे चेअरमन हेमंत नलवडे म्हणाले की, संस्थेच्या बारा वर्षाच्या काळात संस्थेने दूध उत्पादक शेतकऱ्याला कायम मदतीचा हात दिला आहे. तसेच दहा दिवसाला पगार करणारी आपली एकमेव संस्था असून जे सभासद स्वच्छ दूध घालतात त्यांना संस्था कायम चांगला दर देत आली आहे. शेतकरी सभासदांच्या अनेक अडचणी असतात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम संस्था तत्पर असते. भविष्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनाविषयी संस्थेमार्फत मार्गदर्शन पर शिबीर राबवले जाणार असून इथून पुढेही दूध उत्पादकांनी चांगले दूध घालून संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन नलवडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार पत्रकार सचिन वाघ यांनी मानले.
Post a Comment