बारामती दर्पण प्रतिनिधी
सांगवी :
जीवनात ध्येय गाठत असताना या प्रवासात खुप अडचणी येतात. पण निराश न होता ठामपणे लढायचं असतं. जर संघर्षाशी दोन हात केले तर यश हे मिळतच. परंतु काही आशावादी, ध्येयवादी व सक्षम सकारात्मक असे असतात की जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण करतात. पहिल्याच प्रयत्नात राज्यशासानाची कृषी सहायक पदवीचे यश मिळवणारी ती होती. परंतु, आपण एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. ध्येय वेगळे होते. मग काय पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत पीएसआय होण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले.
परमेश्वराने सर्वसामान्य शेतकरी असणाऱ्या कदम दांपत्याच्या पदरात दोन मुलींसह एका मुलाचे दान दिले होते. पण 6 वर्षांपूर्वी काळाने घाला घातला आणि धाकट्या मुलाचा अवघ्या 18 व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यू नंतर कदम कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर थोरल्या मुलीचा विवाह झाला. मधव्या मुलीत आई वडिलांनी खाकी वर्दीचे स्वप्न पाहिले. अनेक अडचणींना कणखरपणे सामोरे गेले.. या दिवसांमध्येही परिस्थिती अभावी तिने कोणत्याही अकाडमी शिवाय हे यश मिळवले. 2019 च्या परीक्षेमध्ये ग्राउंडमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळविले. दिवस रात्र मेहनत घेत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून मुलींच्यात राज्यात 12 वा येण्याचा बहुमान तिने मिळवला. या यशस्वी तेजशलाकाचे नाव आहे अश्विनी शरद कदम, मुलाच्या अपघाती मृत्यू नंतर आई वडिलांनी तिच्यात सर्वस्व पाहून अधिकारी होण्याची जिद्द मनी बाळगली होती. खडतर प्रवासातून अखेर पीएसआय होऊन तिने आई वडिलांचे स्वप्न साकार करत यश संपादन केले.
अश्विनी कदम (रा.सांगवी,ता.बारामती ) हिने कोल्हापूर येथे कृषी पदवी हे शिक्षण पूर्ण करून राज्य शासनाची कृषी सहायक या पदाची स्पर्धा परीक्षा दिली होती. तिला एक मोठी विवाहित बहीण आहे. धाकट्या भावाच्या मृत्यू नंतर अश्विनीच्या खांद्यावर सर्व जबाबदारी पडली. अश्विनी लहानपणापासून आभ्यासात हुशार होती. तिच्या वडिलांचे दहावी तर आईचे सातवी पर्यंत शिक्षण झाले होते. परंतु तिच्यात अधिकारी होण्याची क्षमता आहे हे तिच्या आई-वडिलांनी ओळखले होते. आई -वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने पीएसआय होण्याचा सल्ला अश्विनीला दिला होता, आई वडिलांच्या मिळालेल्या पाठबळामुळेच अश्विनीला पोलीस उपनिरीक्षक होता आले. तिच्या या उत्तुंग भरारी मुळे सर्वांनी तिचे भरभरून कौतुकास्पद अभिनंदन केले आहे. पुढे अश्विनीला उपविभागीय पोलिस अधिकारी होण्याची जिद्द असून त्या ध्येया पर्यंत लवकरच पोहचणार असल्याची प्रतिक्रिया अश्विनीने बारामती दर्पण शी बोलताना दिली. यावेळी जेष्ठ नेते प्रकाश तावरे,विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त महेश तावरे,सरपंच चंद्रकांत तावरे,उपसरपंच अनिल काळे,माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राहुल तावरे,ग्रामपंचायत सदस्य विजय तावरे,तंटा मुक्ती अध्यक्ष सुनील मूळीक, अनिल जगताप,दादा तावरे,नंदकुमार तावरे, यांच्यासह
पदाधिकारी व गावकऱ्यांनी अश्विनीचा सन्मान केला.
Post a Comment