बारामती (विशेष प्रतिनिधी- संदिप आढाव)
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर महिनाभर रक्तदान करता येत नाही. त्यामुळे सध्या बारामतीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या आपत्ती काळातील ही गरज ओळखून 'कार्य हीच ओळख फाउंडेशन' ने पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार (ता. 03 जुलै) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल शेजारी असलेल्या स्व. माणिकबाई चांदूलाल सराफ ब्लड बँकेमध्ये होणाऱ्या शिबिरात सामाजिक बांधिलकीतून तरुण वर्गाने लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाच्या काळात बारामतीत मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई जाणवत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर किमान महिनाभर रक्तदान करता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. या संकटाच्या काळात रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नसल्याने काही ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
   रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याने रक्तदात्यांनी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी लोकमत व 'कार्य हीच ओळख फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात येत आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीशी लढताना जास्तीत जास्त रक्ताची उपलब्धता होण्यासाठी युवकांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे तसेच येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास वाफेचे मशीन व स्वदेशी वृक्ष भेट देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post