कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
पायाभूत सुविधांपासून गेली अनेक वर्ष सातत्याने दुर्लक्षित राहिल्यामुळे बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक येथील माळी समाजाने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील पॅनल प्रमुखांच्या चिंतेत भर पडली आहे.
गावठाणा मध्ये शेख आळी या ठिकाणी काही माळी समाजातील कुटुंबे राहतात. मात्र ही कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून उपेक्षित आहेत. या ठिकाणी गेली अनेक वर्षे रस्ते, गटारीची सोय नव्हती. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षी भूमिगत गटार योजना झाली मात्र रस्त्याची अवस्था दयनीय आहे. रस्त्यालगतच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद बनला आहे. त्यामुळे याठिकाणी चारचाकी वाहनांना प्रवेश करता येत नाही. वैद्यकीय अडचणीच्या वेळी खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. रस्त्यालगतचे अतिक्रमण काढावे म्हणून वारंवार तोंडी लेखी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्या ठिकाणचे रहिवासी सोमनाथ लोणकर, संतोष लोणकर, संदीप अडसूळ, सागर अडसूळ, दिव्यांग डॉ गणेश लोणकर यांनी केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे न निघाल्यास पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या कुटुंबीयांनी घेतला असून किमान निवडणुकीपूर्वी तरी याबाबत ठोस लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासकाने द्यावे त्यानंतर आम्ही ही बहिष्कार मागे घेण्याबाबत विचार करू असे त्यांचे म्हणणे आहे.
إرسال تعليق