सचिन वाघ (बारामती) :
गावा खेड्यात राहत असलेल्या नागरिकांना आता आपल्या घराचा मिळकत कर ऑनलाइन भरता येणार आहे. शिंदेवाडीच्या डिजिटल पाटीची संकल्पना पूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. बारामती तालुक्यातील प्रथमच थोपटेवाडी गावामध्ये हा प्रयोग राबवला असून थोपटेवाडी गावातील सर्व घर मिळकतीवर नेमप्लेट व क्यूआर कोड बसवण्यात येणार आहेत. थोपटेवाडी गावातील सर्व नेमप्लेट तयार झाल्या असून या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत थोपटेवाडी येथे बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किशोर माने ,सरपंच रेखा बनकर , उपसरपंच शुभांगी अडागळे सोमेश्वरचे संचालक सुनील (तात्या) भगत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश (मामा) खोमणे, माजी सभापती प्रदीप (बापू )धापटे, प्रताप (काका) धापटे तसेच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांच्या उपस्थित करण्यात आला. ग्रामीण भागात नागरिकांना आपल्या मिळकतींचा कर ग्रामपंचायत मध्ये जाऊनच भरावा लागत होता. आता या संकल्पनेमुळे प्रत्येक नागरिक आपला मिळकत कर घरूनच क्यूआर कोड स्कॅन करून आता ऑनलाईन भरू शकणार आहे. केवळ कर भरण्यासाठी याचा उपयोग होणार नसून मिळकत धारकाला आपल्या मिळकतीची सर्व माहिती म्हणजे मिळकतीची बाकी, घराची रचना, घराचे क्षेत्रफळ आधी सर्व माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात थोपटेवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी वर्षा सालगुडे म्हणाल्या की, थोपटेवाडी गावच्या शंभर टक्के नेमप्लेट तयार झाल्या असून आठ ते दहा दिवसात सर्व मिळकतीवर नेमप्लेट व क्यूआर कोड लावले जातील,या डिजिटल क्यूआर कोड संकल्पनेमुळे मिळकत करा मध्ये पाच टक्के वाढ होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पानसरे यांनी केले तसेच आभार वर्षा सालगुडे यांनी मानले.
◾काळासोबत ग्रामपंचायत करवसुलीसाठी आधुनिक डिजीटल माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे.थोपटेवाडी ग्रामपंचायतीने याबाबत तालुक्यात सुरवात केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अपेक्षा आहे की या माध्यमातून कर वसुली मध्ये नक्की वाढ होईल.
किशोर माने - गटविकास अधिकारी,बारामती
◾सध्याच्या काळात सर्वांचाच ऑनलाईन पेमेंट करण्यावर भर असतो. क्यूआर स्कॅन करून घरबसल्या आपल्या मिळकतीची माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच ऑनलाईन मिळकतकर भरता येणार आहे. बदलत्या काळाबरोबर ग्रामपंचायतीने टाकलेले हे एक पाऊल कौतुकास्पद आहे.
शशिकांत पानसरे - नागरिक,थोपटेवाडी
إرسال تعليق