बारामती दर्पण प्रतिनिधी:
कोऱ्हाळे बुद्रुक:
बारामती तालुक्यातील तरडोली येथे युवा शेतकरी सागर पंडित जाधव यांनी दुधाला प्रति लिटर ४२ रुपये हमीभावा सहीत विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी केलेल्या उपोषणानंतर शासना मार्फत आश्वासन देऊनही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
या उपोषणाला कोऱ्हाळे बुद्रुक पंचक्रोशीतून सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. उद्या रविवार दिनांक 12 रोजी कोऱ्हाळे बुद्रुक पंचक्रोशीतील दूध उत्पादकांच्या वतीने निरा बारामती महामार्गावर रास्ता रोको केला जाणार असून कोऱ्हाळे बुद्रुक ते तरडोली गावापर्यंत दूध उत्पादकांच्या वतीने दुचाकी रॅली काढत या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मागील महिन्यात दिनांक १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या दरम्यान दुधाला प्रतिलिटर ४२ रुपये भाव मिळण्यासाठी जाधव यांनी उपोषण सुरू केले होते. या सुरु असलेल्या उपोषणावर बारामती तहसीलदार यांनी मध्यस्थी करून जाधव यांना आश्वासीत केले होते. बारामती तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मदतीने दिनांक ७ ऑक्टोबर रोजी हे उपोषण मागे घेण्यात आले होते. तहसीलदार बारामती यांनी उपोषण सोडताना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने सागर जाधव यांनी दिनांक ६ नोव्हेंबर पासून पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. या उपोषणाचा आजचा साहवा दिवस आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर ४२ भाव मिळावा. याचबरोबर दुष्काळ सदृश्य भागात चारा डेपो करावेत. जनावरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. प्रत्येक गावात स्वतंत्र शासकीय पशु वैद्यकीय डॉक्टर व लॅब उपलब्ध करून देणे. दुग्ध व्यवसायासाठी दुग्ध विकास सोसायटी प्राप्त होणे. पशुखाद्यावर शासनाचे नियंत्रण असावे. जनावरांना विमा कवच योजना उपलब्ध करावी. यांसारख्या अनेक मागण्यांसाठी या युवा शेतकऱ्याने आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. याबाबत तालुक्यातील विविध शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळत असून जोपर्यंत शासन दुधाला ४२ रुपये हमीभाव देत नाही तसेच इतर मागण्या पुर्ण करीत नाहीत. तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सागर जाधव यांनी बारामती दर्पणशी बोलताना सांगितले.
إرسال تعليق