बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती:
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती मध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन आज शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाने तीव्र विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संचालक मंडळ व मराठा क्रांती मोर्चा यांची शुक्रवारी एक बैठक आयोजित केली होती, मात्र ही बैठक शुक्रवारी निष्फळ ठरली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार यांना मोळी टाकून न देण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आज सकाळपासूनच मराठा बांधव माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी पुतळ्या जवळ एकत्र जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही माळेगाव कारखान्यावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अजित पवार यांनी या कार्यक्रमाला येऊ नये या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चा चे आंदोलक ठाम होते. अखेर दुपारी साडेबारा वाजता माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशव बापू जगताप यांनी आंदोलन स्थळी येत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून आजचे मुळीपूजन शेतकरी व उपस्थित महिलांच्या हस्ते घेण्याचा निरोप दिला असल्याचे सांगितले.  तसेच मुळीपूजनालाही शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती जगताप यांनी देतातच या निर्णयाचं मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मात्र जोपर्यंत मोळी पूजन होत नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चाचे बांधव जागा सोडणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावर काही वेळातच मुळीपूजन होऊन फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतरच आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा... आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं... अशा घोषणा देत शांततेत जागा सोडली.

Post a Comment

أحدث أقدم