बारामती दर्पण प्रतिनिधी:
सोमेश्वरनगर :
करंजेपुल ( सोमेश्वरनगर ) याठिकाणी असलेल्या स्टॅम्प विक्रेत्याकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असून सदर स्टॅम्प विक्रेता मनमानी पद्धतीने जादा दराने विक्री करत आहे.
     मार्च महिन्यात व एकूणच वर्ष भरात नागरिकांना स्टॅम्पची गरज लागत असते. बँका, सोसायट्या, पतसंस्था यांची कर्ज प्रकरणे तसेच विविध प्रतिज्ञा पत्रांसाठी लोकांना स्टॅम्प ची गरज भासते. करंजे पूल भागात रिठे नामक स्टॅम्प विक्रेते आहेत. मात्र हे विक्रेते लोकांच्या अडचणीचा फायदा घेत नियमबाह्य चढ्या दराने स्टॅम्पची विक्री करत असतात. शंभर रुपयांचा स्टॅम्प एकशे वीस रुपयांना तर पाचशे रुपयांचा स्टॅम्प सहाशे रुपयांना विकला जात आहे. याबाबत सुज्ञ नागरिकांनी विचारणा केली असता आम्ही सर्विस चार्ज आकारतो परवडत नसेल तर स्टॅम्प घेऊ नका असे उलट उत्तर दिले जाते.
     वास्तविक या स्टॅम्प विक्रेत्यांना मूळ किमतीत पाच टक्के नफा मिळत असताना त्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प ला शंभर  रुपये च आकारणे अपेक्षित आहे. बऱ्याचदा नागरिक सोय होते म्हणून एकशे दहा रुपये द्यायलाही तयार असतात. मात्र रिठे हे स्टॅम्प विक्रेते लोकांची अडवणूक करून एकशे वीस रुपये घेतात. अशाप्रकारे लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणे चुकीचे असल्याने त्यांच्या विरोधात उपकोषागार कार्यालय बारामती, उपनिबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांच्याकडे  रिठे यांचा परवाना रद्द करणेबाबात तक्रार करणार असल्याचे काही सुज्ञ नागरिकांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم