इंद्र जिमि जंभ पर बाडव सुअंभ पर,
रावण सदंभ पर रघुकुलराज है |
पवन परिवाहा पर संभु रतिनाह पर,
जो सहसबाह पर राम द्विजराज है |
दावा दृमदंड पर चिता मृगझुंड पर,
भूषण वितुण्ड पर जैसे मृगराज है |
तेज तम अंश पर कन्न जिमि कंस पर,
जो म्लेंच्छ बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है ||

छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन हे अखिल मानव जातीला प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल  परिस्थितीत निवडक मावळ्यांसमवेत शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वकीय आणि परकीय  यांच्या विरोधास समर्थपणे तोंड देत हिमालयाप्रमाणे अढळ राहिले. आपल्या जाज्वल्य पराक्रमाने शत्रूंना समर्थपणे तोंड देऊन सार्वभौम असे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. शिवाजी राजांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. एखादया दिपस्तंभाप्रमाणे महाराजांचे संपूर्ण जीवन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांनी स्वत्रंत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या रयतेच्या सुखासाठी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी अहोरात्र शत्रूशी झुंज दिली. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. आपण महाराजांचा पराक्रम अगदी बऱ्यापैकी जाणून आहोत. काही इतिहासकारांनी तर ते अतिशय योग्य प्रकारे म्हणजे अगदी विश्लेशणात्मक मांडले आहे, अगदी तोरणा जिंकल्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत असंख्य अशा लढाया पाहिल्या ज्यामध्ये आपण महाराजांचा पराक्रम, राजकारण, मुत्सदीपना अशा अनेक गुणांचा अभ्यास केला. साहजिकच, ज्या घराण्यात महाराज जन्माला आले ते घराणे म्हणजे एक पराक्रमी घराणे आणि त्यामध्ये जिजाऊसाहेबांचे संस्कार आणि शिकवण आणि शहाजी महाराजसाहेबांसारखा गुरुमय पिता, एक माणूस जो गडावरच जन्मला आणि सह्याद्रीच्या कुशीत खेळला आणि हाच लहानपणीचा खेळ बघता बघता इतका मोठा झाला की गगनाला भिडला. परंतु, सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात फिरणारे , गडकिल्ल्यात विशेष रुची असणारे शिवाजी महाराज  “समुद्र” या विषयाकडे नक्की कसे वळाले? आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या गोष्टीचा उहापोह करणे नक्कीच क्रमप्राप्त आहे. 

शिवाजी महाराज १२-१३ वर्षांचे असताना म्हणजे १६४२-४३ मध्ये त्यांची रवानगी पुण्याला वडिलांच्या जहागिरीवर करण्यात आली. पुण्यात आल्यावर त्यांनी मावळ व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. आदिलशाहीच्या जहागिरीत राहून येथील किल्ले जिंकून सत्तेची पाळेमुळे रोवली. राजगड, रोहिडा, तोरणा, कुवारगड, कोंढाणा इत्यादी किल्ले ताब्यात आणले. इ.१६५५-५६ मध्ये जावळी सर केल्यावर रायगड किल्ला स्वराज्यात आला आणि स्वराज्याची हद्द समुद्राला जाऊन भिडली, तेव्हा प्रामुख्याने स्वराज्याचा संबंध सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सत्तांशी आला. सिद्द्यांची राजधानी दंडराजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर होती. हे जंजिरेकर सिद्दी किनारपट्टीवर यायचे हल्ले चढवायचे, घरादारांची जाळपोळ करायचे, बायका पळवायचे आणि विकायचे, जनावरे पळवायचे. सिद्द्यांचा हा उपद्रव बंद करणं आणि सिद्द्यांना कायम अडथळा करून जरब बसविण्यासाठी शिवरायांनी आरमाराची स्थापना केली. आरमार निर्मितीमुळे इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या सत्तांना शह बसून सार्वभौमत्व सिद्ध होणार होते. एका आज्ञापत्रात रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, *"आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यागच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवस्यमेव करावे."* पोर्तुगीज दफ्तरातील आधाराप्रमाणे इ.१६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.

"आदिलशाहीचा सरदार शहाजीच्या मुलाने वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला असून तो बलिष्ठ झाला आहे. त्याने काही लढाऊ  गलबते कल्याण, भिवंडी, पनवेल या वसई तालुक्याच्या बंदरामध्ये बांधिली आहेत. त्यामुळे आम्हांस सावध राहणे भाग झाले आहे. ही गलबते समुद्रात फिरकू न द्यावी म्हणून (पोर्तुगीज) कॅप्टन ला आम्ही आज्ञा केली आहे की, त्याने सदर गलबते बंदरातून बाहेर येउच देऊ नये." वसईस जहाज बांधणारे कुशल कारागीर होते. रुय लैताव व्हीयेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगस यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी वीस लढाऊ गलबते बांधण्यास सुरुवात केली. ही जहाजे आपण सिद्द्याविरुद्ध लढण्यासाठी बंधित आहोत, असे शिवाजी राजांनी जाहीर केले होते. कारण असे जाहीर केल्याशिवाय पोर्तुगीज त्या जहाजांना कल्याण-भिवंडीच्या खाडीतून बाहेर समुद्रात पडू देणे शक्य नव्हते. 

शिवाजीचे आरमार तयार झाले तर सिद्द्याबरोबर आपल्यालाही (पोर्तुगीज) त्याचा त्रास होणार या भीतीने शिवाजीचे आरमार तयार होण्यापूर्वी (पोर्तुगीज लोकांनी) नोकरी सोडून द्यावी, म्हणून वसईचा कॅप्टन आन्तोनियु द मेलु कास्त्रु याने प्रयत्न केले. परिणामी ही सगळी मंडळी शिवाजी महाराजांची नोकरी सोडून गुप्तपणे मुंबई व वसई येथे पळून गेली. चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नरास लिहिलेल्या पत्रानुसार चौल मध्ये राजे पन्नास तारवे बांधीत होते त्यातील सात तारावे बाहेर पडण्याच्या तयारीत होती. इ.१६६७ च्या शिवाजीराजांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल विजरई कोंदी द सांव्हिसेन्ति याने एका पत्रात व्यक्त केलेले मत उल्लेखनीय आहे. "शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते. कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीपासूनच कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधिले आणि आज त्यांच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत; पण ही तारवे मोठी नाहीत."

शिवाजीराजांच्या आरमारात गुरबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याची सभासद सांगतो. त्यात मचवे, बभोर, तिरकती पाल होते हा उल्लेख मल्हाररामराव चिटणीस करतो. लढाऊ जहाजात गलबत, गुराबा व पाल ही प्रमुख होती. ही सर्व जहाजे उथळ बांधणीची म्हणजे लांबीच्या प्रमाणात अधिक रुंदीची असत. नाळीकडील भाग खूपच निमुळता व उघडा असे, त्यामुळे त्यांना समुद्राचे पाणी कमी घर्षणाने कापता येई. नाळीवर आलेले पाणी उघडेपणामुळे दोन्ही बाजूंनी वाहून जाई.

जहाज बांधणीसाठी लागणारा चांगल्या प्रकारचा साग कोकणात विशेषतः वसईच्या आसपास मिळत असे. शिवाजीराजांच्या आरमारी व्यवस्थेत २०० जहाजांचा एक सुभा केला जात असे. मायनाक भंडारी व दौलतखान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. तीन डोलकाठ्यांची जहाजे व्यापाराकरिता मस्कत पर्यंत जात असे. आरमाराचे संरक्षण किनाऱ्यावरील किल्ले व खड्या यामुळे होत असे. आरमारात कोळी, भंडारी, गाबित, भोई, खारवी, पालदी-मुसलमान व इतर यांचा भरणा असे.
युद्धाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र येऊन झुंजावे आणि गनिमाला बुडवावा. गनीम दगाबाज असेल तर विश्वास न धरिता त्याचे जहाज फोडून टाकावे. आरमारासाठी लागणारे सागाचे लाकूड हे अरण्यातून आणावे पण परवानगीने तोडावे असे महाराज म्हणत असत. आंबे, फणस हे आरमाराच्या उपयोगी असल्याने त्याचे जतन करावे ते वाढविण्यास कष्ट पडतात म्हणून ते त्याच्या मालकाकडून विकत घ्यावे  त्यांना दु:ख होईल असे काहीही करू नये. यावरून शिवाजीराजे रयतेचा किती विचार करत होते हे स्पष्ट होते.

यावरूनच राजांचे आरमाराबाबतचे धोरण स्पष्ट होते. याच आरमाराने खांदेरीच्या मोहिमेच्या वेळी इंग्रजांची पाचावर धारण केली जे इंग्रज सुरुवातीला ह्याच आरमाराला नावं ठेवीत होते तेच इंग्रज १ नोव्हेंबर १६७९ च्या पत्रात लिहितात, "त्या लहान सरपटणारया होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात. आता आम्हाला असे वाटू लागले आहे की, आमच्याकडे तसल्या होड्या असतील तर आम्हालाही मदत होऊ शकेल." पत्रातील या उलेखावरूनच स्वराज्याच्या आरमाराची महती कळते.

शिवाजीराजांनी लढाऊ नाविक दलाला पाठबळ देण्यासाठी अनेक सागरी किल्ले बांधले. मुंबईपासून १५० किलोमीटर दक्षिणेला महाराजांनी आपला मुख्य नाविक तळ उभारला. ही जागा पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्दीच्या नौदल तळांपासून सुरक्षित अंतरावर होती. मालवणपासून दोन किलोमीटर पाण्यात असलेल्या खडकावर उभारलेला हाच तो सिंधुदुर्ग किल्ला होय. त्यानंतरच्या काही वर्षांत एकंदर ५८ किल्ले शिवरायांनी वापरात आणले. विजयदुर्ग आणि अलिबागजवळील कुलाबा हे त्यातील महत्त्वाचे किल्ले होत. १६८० पर्यंत मराठा नौदल खूपच शक्तिशाली बनले होते. मराठा नौदलाकडे त्याकाळी ३०० टन वहनक्षमता असलेली ४५ मोठी जहाजे होती, तर १५० छोट्या नौका आणि सुमारे ११०० गलबते या ताफ्यात होती. नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे या पराक्रमी दर्यावर्दीने मराठा नौदलाची सूत्रे हाती घेतली होती. त्याने मराठा नौदलाची ताकद अशा प्रकारे विकसित केली, की ब्रिटिश कान्होजींना कर देत होते आणि पश्चिमेकडील समुद्रातून मालाची ने-आण करण्यासाठी कान्होजींचा 'पास' गरजेचा ठरला होता. पश्चिम किनारपट्टीवर नौदलाची उभारणी करण्याचे श्रेय निःसंशय छत्रपती शिवाजी महाराजांचेच! असे प्रचंड सागरी साम्राज शिवाजी महाराजांनी निर्माण केले व समुद्र मार्गाने होणाऱ्या हल्ल्यांपासून स्वराज्य सुरक्षित केले.


संदर्भ:-शिवाजी महाराजांचे आरमार: भा.कृ.आपटे , सभासद बखर, चिटणीस बखर, आज्ञापत्र, इतिहासाच्या पाऊलखुणा-१, मराठ्यांच्या इतिहासाची साधने: पोर्तुगीज दफ्तर

डॉ. प्रविण यादव, माळेगाव बुद्रुक बारामती* 
*(Ph.D, LL.B, MBA, M.Com, MCM)*
*मो. 8888340340

Post a Comment

Previous Post Next Post