बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती:
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील कर्तृत्ववान स्त्रियांच्या विविध क्षेत्रातील यशोगाथेचा आलेख समाजासमोर अधोरेखित व्हावा. स्त्रियांमध्ये जिज्ञासा, उर्मी जागृत करणारे आत्मभान यावे, त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आजची स्त्री- आजची सावित्री’ या विषयावर ही राष्ट्रीय महिला परिषद आधारलेली आहे. महाविद्यालयातील जीवराज सभागृहामध्ये दिनांक 9-10 मार्च दरम्यान ही परिषद होणार आहे.
राष्ट्रीय महिला परिषदेचे उद्घाटन श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका लता प्रतिभा मधुकर यांचे बीजभाषण होणार आहे. दोन दिवसांच्या परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे ‘स्थानिक स्वराज्य संस्था व पचांयतराजमधील स्त्रियांचा सहभाग’ या विषयावर बोलणार आहेत. तर प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे हे ‘दृष्य स्त्रिया- अदृष्य श्रम’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत तर ‘नवभक्ती मार्गावरील आजची स्त्री’ या विषयावर लेखिका संध्या नरे- पवार संवाद साधणार आहेत.
परिषदेच्या दुस-या दिवशी ऍड. साधना खट्टी या ‘कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणार लैंगिक छळ विरोधी कायदा’ या विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर ज्येष्ठ दिग्दर्शक सुनील सुकथनकर हे ‘माध्यमातील स्त्री-प्रतिमा’ या विषयावर प्रकाश टाकणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट अभिनेत्या लता करे यांच्या अनुभवकथनाचा कार्यक्रम शेवटच्या सत्रामध्ये होणार आहे.
राष्ट्रीय महिला परिषदेच्या निमित्ताने अभ्यासकांना त्याचे विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्याना आणि अभ्यासकांना या परिषदेच्या निमित्ताने संशोधन पत्रिका, पोस्टर प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळणार आहे. स्त्री अभ्यासकांनी परिषदेच्या निमित्ताने आपल्या विचारांची देवाण-घेवाण या परिषदेच्या माध्यमातून करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी केले आहे. परिषदेचे संयोजन सचव डॉ.सीमा नाईक-गोसावी (मो.नं. ९८५०९३४३४२) व को-कन्व्हेनर म्हणून सौ.सुषमा संगई (मो.नं.८८०५८८६३५०) या काम पाहत असून इच्छुकांनी या मोबाईलवर संपर्क करावा.
Post a Comment