वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या टीमचे परिसरातून कौतुक
वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी): दि:२२
रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार आज बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल १३१७ बॉटल रक्त संकलन करून पोलिस अधीक्षकांनी राबवलेला उपक्रमाची वडगाव पोलिसांनी शान वाढवली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील रक्तदान शिबिराचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे उपस्थित होते.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलिस दुरक्षेत्रात आज दिवसभर रक्तदान शिबिर सुरू होते. वडगाव पोलिसांनी रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर समाजातील सर्वच स्तरातील सर्व जाती धर्मातील लोक यात सहभागी झाले होते. यामध्ये महिला, अपंग व्यक्ती यांनीसुद्धा सहभाग घेतला होता. सायंकाळी उशिरापर्यंत हे रक्तदान सुरू होते.
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ ,सर्व पत्रकार बांधव सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील, होमगार्ड, अपंग व्यक्ती, महिला दक्षता समिती तसेच नागरिकांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण १३१७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सक्रिय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन (३६२), करंजेपुल दुरक्षेत्र (२८३), सुपा दुरक्षेत्र (२६०), पणदरे दुरक्षेत्र (२५८) व मोरगाव पोलीस मदत केंद्र (१५४) अशा एकूण ५ ठिकाणी एकूण १३१७ रक्तपिशवी संकलन झाले.
आज दिवसभरात संपूर्ण पुणे जिल्ह्यात १४४५ रक्त पिशवी संकलन झालेले असून याव्यतिरिक्त फक्त वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिरात १३१७ रक्तपिशवी संकलन झाले आहे ही एक कौतुकाची बाब आहे.
إرسال تعليق