वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी):
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील गणेश सत्यवान गायकवाड व रवींद्र सुदाम गायकवाड (दोघे रा.चोपडज ता. बारामती) या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे, सातारा, सोलापूर ,अहमदनगर या चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. या दोन गुन्हेगारांवर वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये बेकायदा गर्दी जमवणे, मारहाण तसेच खुनाचा प्रयत्न करणे, अनाधिकराने घरात घुसून मारहाण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच अनेक वेळा चोपडज गावामध्ये विनाकारण गोरगरीब जनतेला त्रास देत असल्याने त्यांना अटकही झाली होती, तसेच त्यांच्या वर्तणुकीत बदल व्हावा याकरता त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा झाली होती मात्र यामध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने व भविष्यात गावातील लोकांच्या जीवितास व मालमत्तेस   धोका पोहचू नये व कोणतीही गंभीर घटना घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सदर आरोपींच्या धोकादायक कृतीस प्रतिबंध व्हावा व समाजात तसेच परिसरात शांतता राहावी म्हणून सदर आरोपींना मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६( ब) प्रमाणे हद्दपार करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्फतीने बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सदर प्रस्ताव मंजूर झाल्याने या दोन्ही आरोपींना पुणे, सातारा ,सोलापूर, अहमदनगर या चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केली.

Post a Comment

أحدث أقدم