बारामती - ओबीसी समाजाचे संपुष्टात आलेले राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे व इतर मागण्यांसाठी बारामती येथे आयोजित केलेल्या ओबीसी एल्गार महामोर्चा ला काँग्रेस पक्षाचे नेते अखेर अनुपस्थित राहिले आहेत.
आरक्षण कृती समितीने सर्वच राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांना या मोर्चासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मंत्री विजय वडेट्टीवार येणार होते. आम्ही बारामतीत मोर्चाला येणारच असा विश्वास दिला होता. याआधी ही नाना पटोले यांनी लोणावळा येथील काँग्रेस मेळाव्यात बोलताना बारामतीत होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बारामतीत जाणार असे सांगितले होते. त्यामुळे सत्तेतील घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शीतयुद्ध सुरू होणार का अशी चर्चा सुरू होती.
दुसरीकडे भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहित अनेक आजी माजी आमदारांनी मोर्चाला उपस्थित राहणार होते.राष्ट्रवादीच्या मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे व दत्तात्रय भरणे यांना ही मोर्चाचे आमंत्रण दिले होते मात्र राष्ट्रवादीचे नेते या मोर्चाला उपस्थित राहणार नसल्याचे आधीच नक्की झाले होते मात्र या मोर्चाला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण काँग्रेस नेते बारामतीत येणे म्हणजे अप्रत्यक्षपणे पवारांना आव्हान देण्यासारखे होणार होते. याचा दुरगामी परिणाम सरकारच्या भवितव्यावर होणार होता. मात्र काँग्रेस मधील नेत्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली व भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार योगेश टिळेकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा पार पडला. त्यामुळे सध्या तरी काँग्रेस व राष्ट्रवादीत होणाऱ्या संभाव्य कुरबुरीवर पडदा पडला आहे
Post a Comment