सोमेश्वर नगर (प्रतिनिधी)
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील मुक्ताई हॉटेलवर काल रात्री धुडगूस घालणाऱ्या चार जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल कुमार उत्तम शेंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी  गणेश उर्फ गोट्या जगन्नाथ भंडलकर (रा. मुरूम तवळवणीनगर, ता. बारामती), सोमा पवार, वैभव हनुमंत चव्हाण (दोन्ही रा. खामगाव साखरवाडी ता. फलटण जि. सातारा), रंजीत कैलास भंडलकर (रा. जिंती ता. फलटण जि. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्या चौघांची नावे आहेत. गुरुवार दिनांक १ जुलै रोजी सायंकाळी फिर्यादी हे आपल्या सोरटेवाडी येथील मुक्ताई हॉटेलवर पार्सल सुविधा देत असताना पार्सल चे पैसे मागितल्याच्या कारणावरून या चारही आरोपींनी फिर्यादीस दमदाटी करून फिर्यादीचे भाऊ विशाल यास सोमा पवार या आरोपीने कमरेला असलेल्या सत्तुर डोक्यात मारून गंभीर जखमी केले. जखमी विशाल यांच्यावर  खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून सोनल कुमार शेंडकर यांनी दिलेल्या माहितीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी या चारही आरोपींवर भा द वि कलम 307, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील  तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर शेलार करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم