को-हाळे बुद्रुक(दि:१): बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक महेश मतकर यांनी गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागांमध्ये तीन वर्ष उत्कृष्ट कार्यभार केल्याबद्दल त्यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाकडून पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. मतकर हे 2015 मध्ये राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. गडचिरोलीतील पेरमिली पोलिस स्टेशनला पहिली पोस्टिंग मिळताच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांनी गडचिरोलीतील अतिसंवेदनशील भागांमध्ये पेरमिली पोलीस स्टेशनचा तीन वर्ष कार्यभार सांभाळत नक्षल विरुद्ध प्रभावी कामगिरी करून 15 भरमार बंदुका जमा केल्या होत्या. नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रकल्प राबवून जनतेमध्ये पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण  केली होती. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू न देता निवडणूका पार पडल्या होत्या. विशेष म्हणजे अहेरी तालुक्यातील नदीवरील नक्षलवाद्यांचा विरोध असलेल्या व 20 ते 25 गावांना जोडणाऱ्या पेरमिली - येरमनार अशा 190 फूट लांबी असलेल्या पुलाचे बांधकाम भुमकाला सामाजिक संघटनेचे सहकार्य घेत व पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवत केवळ 18 दिवसात पूर्ण केले होते. तसेच या पुलाचे लोकार्पण नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या रमेश रामटेके यांच्या पत्नी शकुंतला रामटेके यांच्या हस्ते केले होते. या कार्याची दखल घेत त्यावेळचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक व सध्याचे पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मतकर यांचे पत्राद्वारे विशेष कौतुक केले होते. महेश मतकर हे सध्या पुणे जिल्ह्यातील तळेगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून  पोलीस महासंचालक पदक जाहीर होताच परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم