मांजरी महाविद्यालयातील प्रा.केतन डुंबरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

        मांजरी बु: मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांना नुकताच नेहरू युवा केंद्र पुणे तसेच युवाकार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्न अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था, पुणे यांच्या वतीने २०२० या वर्षीचा “आदर्श शिक्षक पुरस्कार ’’ रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी मा.किसन रत्नपारखी यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
           यावेळी संस्था अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, मांजराईदेवी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष विठ्ठल भापकर, रयत सेवक बँकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे, के.के.घुले विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा.केतन डुंबरे हे मागील ४ वर्षांपासून मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्यांनी महाविद्यालय पातळीवर ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यापीठ व राज्यस्तरीय हरित वारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रम, नदी स्वच्छता अभियान, आपत्तीव्यवस्थापन शिबीर, जलसंधारण, वृक्षारोपण, गिरिभ्रमण अशा विविध उपक्रमात विद्यार्थ्यांसह सहभाग घेतलेला आहे. 
            प्रा.केतन डुंबरे यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड.संदिप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, सहसचिव एल.एम.पवार, सहसचिव (प्रशासन) ए.एम.जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم