सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या पगारदार खातेदार ग्राहकांसाठी वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी संरक्षण योजना लागू केली असून यामध्ये कर्मचाऱ्यांना वैयक्तिक तीस लाखांचे अपघात संरक्षण मिळणार आहे.
    पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा बँकेचे सेवक, विविध कार्यकारी विकास सोसायट्यांचे सचिव यांचे पगार खाते पुणे जिल्हा सहकारी बँकेत आहे. मात्र काही दिवसांपासून पगारदार खातेदारांनी राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे विमा पॉलिसी असावी असा माणूस संचालक मंडळाकडे बोलून दाखवला होता. त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत पगारदार खातेदार ग्राहकांना वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी चे संरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला. यामध्ये खातेदारांच्या संमतीने वार्षिक 660 रुपये प्रीमियम खाती टाकून ही अपघात विमा संरक्षण योजना लागू होणार आहे. यामध्ये खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास तीस लाखांपर्यंत विम्याची रक्कम त्या खातेदाराच्या वारसांना मिळणार आहे. शिवाय अपघातामध्ये एक हात, एक पाय अथवा एक डोळा निकामी झाल्यास विम्याची अर्धी रक्कम म्हणजे पंधरा लाखापर्यंत ची रक्कम खातेदारांना मिळणार आहे. 
     बँकेच्या या योजनेचे स्वागत पगारदार खातेदारांनी केले असले तरी ही योजना केवळ अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास लागू होणार आहे. मात्र नैसर्गिक मृत्यू झाल्यास ही रक्कम मिळणार नाही त्यामुळे बँकेने याही बाबीकडे लक्ष देत या योजनेत सुधारणा करत नैसर्गिक मृत्यूचाही विमा काढावा अशी मागणी पगारदार खातेदार करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم