सुपे(दि२२) : बारामती तालुक्यातील सुपे येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव जयवंत वाघ ( वय ८८)यांचे वृद्धापकाळाने आज दि.(२१) रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान निधन झाले . त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा , सून असा परिवार आहे. सुपे भागातील अनेक प्रश्न शासनदरबारी मांडून ते सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील होते यामध्ये प्रामुख्याने दौंड बारामती ,पुरंदर तालुक्याला शेती पाण्यासाठी वरदान ठरलेल्या जनाई शिरसाई योजनेमधील जनाई योजनेचे रखडलेले काम पूर्ण होऊन योजना कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना हे पाणी कायमस्वरूपी मिळावे यासाठी २ ऑक्टोबर २००२ रोजी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती दिवशी प्राणांतिक उपोषण केले होते. त्यासाठी चक्री उपोषण करून सोपानकाका पानसरे, बबनराव बोरकर,दिनकर भाऊ हिरवे,बबनराव कदम, लक्ष्मणराव दरेकर ,संपतराव काटे ,इस्माईलभाई बागवान, रघुनाथराव सकट, भागुबाई बारवकर आदींसह ११० कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.या आंदोलनासाठी देविदास कुंभार, ज्ञानेश्वर कौले ,संजय दरेकर ,गोविंदराव खैरे,आबा चांदगुडे आदींनी महत्वाची भूमिका बजावली होती.
जनाई शिरसाई ऊपसा जलसिंचन योजनेच्या आंदोलनापासून योजना कार्यान्वित होण्यासाठी व लक्ष वेधण्यासाठी दैनिक सकाळ, दैनिक पुढारी ,दैनिक लोकमत या दैनिकांनी मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये दैनिक सकाळचे जयरामजी सुपेकर , दैनिक पुढारी चे सुदामराव नेवसे, दैनिक लोकमतचे माणिकराव दांगडे पाटील सर यांनी आंदोलनाच्या बातम्या वृत्तपत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी कमालीची शिकस्त केली . प्रतिकूल परिस्थितीतही बातम्या पाठवण्यासाठी फार मोठी धावपळ केली . दिवसभर आंदोलनाच्या ठिकाणी बसून अपडेट घेऊन फॅक्स च्या माध्यमातून बातम्या देऊन एसटी पार्सल ने फोटो पाठवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली . लाईट नसल्यावर संजय मामा दरेकर यांनी इन्वर्टरच्या माध्यमातून फॅक्स पाठवण्यास मोठे सहकार्य केले.
ऑफिस मधून स्वारगेट बसस्थानकावर एसटी द्वारे पाठवलेले फोटो घेण्यासाठी ऑफिस चा माणूस पाठवला जात होता अशा प्रकारचे दिव्य पार पाडून दुसऱ्या दिवशी बातमी आल्यानंतर कमालीचा आनंद मिळत होता आणि वाचकही कुतूहलाने आपल्या भागातील बातमी दुसऱ्या दिवशी वाचनात गुंग होत होते. यामध्ये प्रामुख्याने दैनिक पुढारी ने पहिल्याच पानावर बातमी छापून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाची व्याप्ती पोहोचवली होती. त्यामुळे या जन आंदोलनात अनेक लोक सहभागी होऊन आपला पाठिंबा सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघ यांना देत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या आंदोलनाची दखल घेऊन कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून अखेर जनाई शिरसाई योजनेच्या कामास गती देऊन ही योजना कार्यान्वित करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. जिराईत भागातील जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आत्तापर्यंतचे सगळ्यात मोठे आंदोलन निश्चितच सुपे परगण्याच्या इतिहासामध्ये अजरामर ठरले आहे.
सामाजिक कार्यकर्ते बबनराव वाघ यांच्यावर सुपे येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांना सुपे परगण्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. परिस्थितीने लंगडा असणारे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या प्रश्नांसाठी खारीचा वाटा म्हणून झगडणारे,गांव बंद,जनावरांसाठी चारा छावणी इत्यादी प्रश्नांसाठी नेहमी अग्रेसर असणारे वाघ आण्णा नक्कीच आठवणीत राहतील यात यत्किंचितही शंका नाही. जयहिंद जय महाराष्ट्र
إرسال تعليق