वडगाव निंबाळकर(दि१२) - हेमंत गडकरी
जिरायत भागासाठी वरदान ठरलेले वाकीचे धरण पूर्ण भरले असून महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे व यांत्रिकी विभागाच्या वतीने धरणाच्या भरावावरील काटेरी झाडी काढण्याचे काम सुरू आहे. या कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालकाध्यक्ष संभाजी होळकर व बारामती सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप पाटील यांनी भेट देत पाहणी केली.
दोन दिवसांपूर्वी वाकी, मुर्टी, लोखंडवाडी, भगतवाडी, मोढवे भागात जोरदार पाऊस झाला होता त्यामुळे वाकी धरणात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा झाले तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेतून ही पाणी सोडल्याने वाकीचे धरण 100 % भरले आहे. परवा जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या सांडव्या वरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले होते. त्यामुळे धरणाच्या चाऱ्या व पोट चाऱ्या तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. वडगाव निंबाळकर येथे अनेक घरात पाणी घुसले होते तर अनेक ओढ्यावरील पुल पाण्याखाली गेले होते. काही जणांनी तर धरण फुटल्याची अफवा पसरवली होती. मात्र बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, राषट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता प्रवीण घोरपडे व वडगाव निंबाळकर चे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी धाव घेत उपाययोजना केल्याने पुढील अनर्थ टळला होता.
त्यानंतर लगेचच शासनाने वाकी धरण्याच्या भरावा वरील काटेरी झाडी काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच धरणाच्या मुख्य कालव्याची ही डागडुजी सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता प्रवीण घोरपडे यांनी सांगितले.
Post a Comment