बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जाहीररीत्या फटकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व पवार कुटुंबीयांत अनेक घडामोडी घडत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका काय याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र बारामतीच्या दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पार्थ पवार यांच्या विषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठरल्याप्रमाणे नियमित शनिवार व रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर असतात. आज त्यांनी बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करत माहिती घेतली. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शरद पवारांनी नुकतेच पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची काय भूमिका असणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत बारामतीच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
दरम्यान काल  शनिवार  दि .15 रोजी पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी  काका श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पोहोचले होते. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात उशिरा रात्री ही बैठक झाली. यावेळी काका श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढली. या बैठकीला खुद्द अजित पवार उपस्थितीत होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांची आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाल्याचेही समजते.

Post a Comment

أحدث أقدم