को-हाळे बुद्रुक: दि१५:
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीने साजरा करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही मंडळाने कसलाही मंडप टाकू नये व कोणत्याही स्पर्धा किंवा गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करू नये असे आव्हाहन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन कोरोना विरोधात पूर्ण क्षमतेने लढत असून यावर्षीचा गणेशोत्सव प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून सर्वांनी साध्या पद्धतीने साजरा करावा तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई केली जाईल अशी माहीती सोमनाथ लांडे यांनी साप्ताहिक बारामती दर्पणशी बोलताना दिली.
शासन नियमानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूट मर्यादा असेल.उत्सवाकरिता वर्गणीदेणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमशिबीरे उदा. रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
गणपती मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क,सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. जे मंडळ नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनास सहकार्य करणार नाही अशा मंडळावर कारवाई करणार असल्याचे लांडे यांनी सांगितले.
Post a Comment