को-हाळे बुद्रुक : (दि२७)
अगदी खेळण्या बागडण्याच त्याच वय..... मात्र या वयात हृदय शस्त्रक्रियेच निदान झालं.... शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम ऐकून तर कुटुंबच हादरलं......मात्र यासाठी मित्र परिवारासह नातेवाईक धावून आले. आर्थिक तडजोड ही झाली, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होतं, हृदयशस्त्रक्रियेवेळी कुटुंब, मित्रपरिवार आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांची हार झाली अन नियतीच जिंकली.
ही कहाणी आहे बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावच्या गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या कष्टाळू रंणजित गवळी या मुलाची. वय अवघ वीस ...कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारं मात्र मुलगा रंणजीत यांच्या हृदयशस्त्रक्रियेचं निदान झालं, दोन शस्त्रक्रिया असल्याने ही मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. डॉक्टरांनी यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च सांगितला. यासाठी मित्र परिवारासह सर्वचजण धावून आले.शंभर रुपयांपासून ते पाच हजार ....दहा हजार रुपयांपर्यंत एका एका मित्राने मदत केली. एवढ्यावर न थांबता सर्व मित्रांनी अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले.या आव्हानाला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला. नातेवाईक, पंचक्रोशीतील सामाजिक ,राजकीय व प्रशासनात कार्यरत असलेल्या व्यक्तींनीही सढळ हाताने मदत केली.
आणि काल दिनांक २६ रोजी पुणे येथिल नामांकित हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. काल दिवसभर ही शस्त्रक्रिया सुरू होती.मित्र परिवार रंणजितच्या वडिलांकडून व भावाकडून वेळोवेळी फोनवरून माहिती घेत होते.मात्र दुपारनंतर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने उशिरा रंणजित याचं दुख:द निधन झाले. कुटुंबासह गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला, मित्र परिवारानेही काळजावर दगड ठेवत हे सत्य अखेर स्वीकारले आणि आज पहाटे गावात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेर नियती जिंकली असली तरी हाता तोंडाला आलेला मुलगा गेल्याने कुटुंबासह मित्रपरिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या दुःखातून परमेश्वराने सर्वांना सावरण्यची इच्छाशक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सर्व मित्र परिवाराच्यावतीने रणजीत यास भावपूर्ण श्रद्धांजली.
सचिन वाघ
संपादक- सा.बारामती दर्पण
Post a Comment