वडगाव निंबाळकर - हेमंत गडकरी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात भीमसेन कापूर जाळण्याचा व लिस्ट्रिन माऊथवॉश वापरण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जारी करण्यात आले आहेत.
राज्यात सध्या मुंबई व ठाण्यानंतर पुणे जिल्ह्यात कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण पोलिसांकडून काही अभिनव योजना राबविण्यात आल्या. यामध्ये कार्यालयात भीमसेन कापूर जाळण्यात आला. हा कापूर कार्यालये व घरे निर्जंतुक करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. तसेच लिस्ट्रिन हे माऊथवॉश पाण्यात टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या केल्याने तोंडाचे निर्जंतुकीकरण होते व कोणतेही निर्जंतुकीकरण होत असल्याचे दिसून आले.
हे दोन्ही प्रयोग कल्याण येथे यशस्वी झाल्याने त्याठिकाणी पोलीस दलातील एका ही कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी आपल्या कार्यालयात भीमसेन कापूर जाळावा व लिस्ट्रिन या माऊथवॉश चा वापर करावा असा बिनतारी संदेश पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील जि. वि. विभागाचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याकडून सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आला आहे.
Post a Comment