कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालला आहे. वाढत्या तापमाना बरोबर वन्य प्राण्यांच्या जीवाची काहिली होत आहे त्यामुळे बारामती वन विभागाच्या वतीने मुढाळे येथील वनक्षेत्रातील पाणवठ्याची दुरुस्ती करण्यात आली.
तालुक्यातील मुढाळे गावात मोठया प्रमाणावर वनक्षेत्र आहे. यामध्ये चिंकारा, ससे, लांडगे, कोल्हे, तरस, घोरपडे असे वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. उन्हाळा सुरू होताच प्राण्यांना जास्तीचे पाणी लागते. मुढाळे येथे वन परिक्षेत्रात वन विभागाच्या हद्दीत तीन पाणवठे आहेत. मात्र त्यातील दोन नादुरुस्त आहेत. त्यामुळे एकाच पाणवठ्यावर ताण येतो. नादुरुस्त पाणवठ्यात भरलेले पाणी लागलीच गळून जाते. काही वन्य जीव प्रेमींनी ही बाब करंजेचे वन परिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर यांच्या कानावर घातली. त्यानंतर रासकर यांनी तात्काळ पावले उचलत पाणवठ्याची योग्य दुरुस्ती केली. यावेळी वनरक्षक वैभव कंक, वनमजूर सुभाष पाणसांडे, योगेश कदम उपस्थित होते.
दुरुस्त झालेल्या पाणवठ्यामुळे आता वन्य जीवांची मोठी सोय होणार असून राहिलेला एक पाणवठा लवकरच दुरुस्त करणार असल्याचे वन परिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर यांनी सांगितले.
إرسال تعليق