बारामती : हेमंत गडकरी
ओबीसी प्रवर्गाची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ही मागणी गेली अनेक वर्ष होत आहे. अनेक खासदार तसंच विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी तशी मागणी केली आहे. आज राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी देखील ओबींसीची स्वतंत्र जातीनिहाय जणगणना झालीच पाहिजे अशी मागणी संसदेत केली या मागणीचे महाराष्ट्रभर फिरून स्वागत करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी दिली आहे.
संसदेत आज झालेल्या चर्चेमध्ये डॉ. कोल्हे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी २०२१ मध्ये जी जनगणना होणार आहे त्यामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यामध्ये देखील ओबीसींचा कॉलम स्वतंत्ररित्या समाविष्ट केला जावा, अशी मागणी खासदार कोल्हेंनी केली आहे.
यावेळी कोल्हेंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘हु वेअर द शुद्राज’ या ग्रंथाचा दाखला देत जोपर्यंत ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसी समाज आणि शासनाला देखील त्यांचे खरे प्रश्न समजणार नाहीत असं म्हटलं आहे.
दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे. विविध योजना यशस्वी होतील जेव्हा शेवटच्या रांगेमधला शेवटचा नागरिक लाभार्थी होईल असं मतंही अमोल कोल्हेंनी चर्चेदरम्यान मांडलं.
إرسال تعليق