माळेगाव प्रतिनिधी-
पॅन टाकीची स्वच्छता करताना विशिष्ट प्रकारचा गॅस तयार होऊन त्या वासाने तब्बल आठ कामगारांना त्रास झाला असुन दोन कामगार बेशुद्ध पडले.या बाधित कामगारांवर बारामती येथिल खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर घटना माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सकाळी नऊ वाजता घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
राज्यातील अग्रेसर असलेल्या माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगाम संपल्यावर नेहमी प्रमाणे विविध यंत्र सामुग्रिची स्वच्छता केली जाते.आज सकाळी नऊ वाजता कारखान्यात पॅन टाकीची स्वच्छता करताना एक विशिष्ट प्रकारच्या वायुमुळे स्वच्छता करणा-यांना कामगारांना श्वसनासाठी पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आठ कामगारांना त्रास झाला. यामधे रामभाऊ येळे व जालिंदर भोसले हे दोघे जण बेशुद्ध पडले.
याच ठिकाणी उपस्थित असलेले कामगार बाळासाहेब ढमाळ,सुनिल आटोळे व सोमा चव्हाण यांनी तातडीने कामगारांना मदत करत उपचारासाठी बारामती येथिल खाजगी दवाखान्यात दाखल केले.
घटनेची खबर मिळताच कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे,उपाध्यक्ष तानाजी कोकरे,कार्यकारी संचालक विजय वाबळे व इतर संचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हि दुर्घटना नेमकी कशी झाली याची सविस्तर माहिती घेऊन उपचारासाठी दाखल कामगारांच्या तब्बेतेची चौकशी करुन सर्व उपचार करण्याच्या सुचना दिल्या.
दरम्यान माळेगाव कारखान्याच्या रामभाऊ येळे(माळेगाव),जालिंदर भोसले (निरावागज),राजेंद्र तावरे,शरद तावरे,प्रविण वाघ ( सर्व.रा.सांगवी),सुनिल पाटिल (टेंभुर्णी),घनश्याम निंबाळकर (भिकोबानगर),शशिकांत जगताप (पणदरे) या आठ कामगारांवर उपचार सुरू असुन सर्वांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती उपचार करणा-या डाॅक्टरांनी दिली आहे.
إرسال تعليق