सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या पत्नीचा ह्रदय पिळवटून टाकणारा लेख... सलाम प्रमोद पोरे यांच्या सारख्या असंख्य पोलिस बांधवांना......

On Duty २४ तास,

               श्याम ची बदली वर्षापूर्वी पुणे ग्रामीण भागात झाली. 17 वर्ष मुंबई ठाणे जिल्ह्यात  नोकरी केल्यानंतर ग्रामीण भागात अगदी मोकळ्या व शुद्ध हवेत खूप बरे वाटत होते. पोलीस ड्युटी म्हणजे २४ तास नोकरीशी बांधील.  सण, समारंभ असं काहीही पोलिसांच्या वाट्याला येत नाही. गेली 15 वर्ष तो घराच्या गणपतीला पण गेला नव्हता. ग्रामीण भागात शहरासारखी दगदग नव्हती. पण काम भरपूर होत. आज इकडे बंदोबस्त तर उद्या लांबच्या गावाला आणि एरव्ही गुन्हयाचे तपास चालूच असायचे.
              त्यातच भर म्हणून की काय कोरोना सारखी जागतिक महामारी आली. भारतात २१ दिवसांचा lockdown जाहीर केला. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्वांना घरातच राहण्याचे शासनाने आव्हाहन केले. पोलिसांचे काम मात्र वाढले.
              श्याम सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस स्टेशन च्या दूरक्षेत्रात प्रमुख पदावर कार्यरत होता. त्यांचा बंदोबस्त, गावागावात जनजागृती करने, लोकांना जीवना- वश्यक गोष्टी उपलब्ध करून देणे, बाहेर गावाहून आलेल्या लोकांच्या तपासण्या करून घेणे, लोकांना घराबाहेर न पडणे याबाबत वारंवार लाऊडस्पीकर द्वारे गावागावात जाऊन सूचना करणे चालू होते. त्यात त्यांच्याच हद्दीत एक कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. आता मात्र श्याम खूप टेन्शन मध्ये आला. कारण गावाच्या बाहेर सापडणारा कोरोणाचा रुग्ण त्याच्यात हद्दीमध्ये सापडला त्यामुळे आधीच लोकांना वारंवार विनवण्या करून सुद्धा लोक घराबाहेर पडत असल्याने त्या रुग्णाच्या संपर्कात जर गावातील आणखी लोक आले तर मग मात्र प्रसार जोरात   होणार, या चिंतेने त्याला खूप ग्रासले होते आणि आता तर रात्रीचा दिवस करून हद्दीत फिरणे सुरू झाले. श्यामला घरी जाताना खूप विचार मनात यायचे. आज मी कोणाकोणाच्या संपर्कात आलो. मला जर काय झाले तर काय होईल ते होईल पण घरी दोन छोटी छोटी मुलं आणि पत्नी आहे, माझ्यामुळे त्यांना जर काय झाले तर काय करायचं या चिंतेने त्याला खूप ग्रासले. त्यात भर म्हणून कि काय त्याचे हद्दीत एक साखर कारखाना होता. ज्याच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. त्यात एका मोठ्या पक्षाची सत्ता जाऊन दुसर्‍या एका मोठ्या पक्षाची सत्ता आलेली होती. कारखान्यातील राजकारणाला हिंसक वळण लागले होते. त्यात कोरोना सारख्या रोगाने समाजाला ग्रासलेले होते. त्यामुळे कोणाही व्यक्तीस घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती जे कोणी परगावी किंवा कामानिमित्त जेथे जेथे अडकले असतील त्यांना तेथेच पुढील आदेशापर्यंत राहण्याबाबत सरकारी आदेश आलेले होते. त्याचवेळी स्थानिक साखर कारखाना अजूनही चालू असल्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील ऊस तोड कामगार व कारखान्यातील कामगार असे सुमारे 13 हजार ऊस तोड कामगार कारखान्यावर अडकून पडले होते. कोरोनाचे संकट आल्यामुळे त्यांना ही त्यांच्या गावी जाण्याची घाई झाली होती त्यांची लहान लहान लेकरे गावी व ते या ठिकाणी अडकून पडले होते त्यांनी काहीही झाले तरी चालेल पण गावी जाण्याचा हट्ट धरला होता त्यात प्रशासनाने कुठेही न जाणे बाबतचे आदेश काढले असल्यामुळे सदरचे लोक एकत्र जमावाने जमून कारखाना प्रशासन तसेच पोलिसांकडे विनवण्या करीत होते परंतु प्रशासनाच्या आदेशामुळे सर्वांचे हात बांधले होते. श्याम त्यांना पोट तिडकीने सांगत होता की तुम्हाला जाता येणार नाही. त्यात शासनाने जर असे कोण परस्पर लोक निघून जात असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे आदेश होते त्यात समोरचे कामगार हे गरीब मुलांच्या तहानेने व्याकुळ झालेले. यांच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळणे अशी द्विधा मनस्थिती श्यामची झालेली होती. कितीक विनवण्या करून बेंबीच्या देठापासून लोकांना समजावून सांगून कसेतरी लोकांना शांत केले. त्यांची रोजची जेवणाची, राहण्याची सोय. त्यात लोक घरी जाण्यासाठी पोलीसांवर वारंवार तगादा लावत होते. कामाची काही वेळच राहिली नव्हती.
             बाहेर अशी गंभीर परिस्तिथी पहिल्या मुळे घरी त्याने सर्वाना बजावले होते कोणीही बाहेर पडायचे नाही. गेले २ आठवडे राधिका आणी २ मुलं उंबऱ्याबाहेर पण गेले नव्हते. श्याम जाताना दार उघडायचा ते श्याम आल्यानंतरच, काही साहित्य लागले तर सर्व श्यामच आणायचा. राधिका जमेल तेवढ whatsapp ग्रुप वरून मागवायची. इतर वेळी राधिका सर्व पुढे होऊन करत असे घरात काय हवे नको, मुलांची शाळा, बँकेची कामे. पण आता तिचाही नाईलाज होता. तीने बाहेर जायचे म्हंटले तर मुलांना कुठे ठेवायचे. त्यामुळे बाहेरच्या कामांबरोबरच घराच्या कामाचा पण ताण श्याम वर पडत होता. त्यामुळे दुहेरी भूमिका पार पाडताना त्याची कसरत व्हायची. श्याम घरी आल्या बरोबर राधिका बाहेरच त्याचावर sanitizer चे स्प्रे ने डोक्यापासून पायापर्यंत फवारणी करत असे आणि मग मुलांना घेऊन एका रूम मध्ये जात. श्याम थेट बाथरूम मध्ये जात असे. स्वतः चे स्वतः कपडे धून dettol मध्ये पिळून ठेवत असे. नंतर मुलांना भेटे ते पण लांबून. तो वेगळ्या रूम मध्ये झोपे. अशा पद्धतीने त्याने स्वतःला घरातच quarantine करून घेतले होते. कामावर सुद्धा तो स्वतः बरोबरच बाकी कर्मचाऱ्यांची सुद्धा जातीने काळजी घ्यायचा. आपणच आजारी पडलो तर बाकीच्याचे रक्षण कोण करणार? असे त्याचे मत. 
             एक दिवस बातमी आली मुंबई मधील त्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोना झाला. त्यांच्या सोबतच्या १५ कर्मचाऱ्यांना quarantine केले गेले. मित्राशी बोलताना त्याला समजले कि, जर मी पॉसिटीव्ह आलो तर माझा २ वर्षाच्या मुलाला लगेच ICU मध्ये शिफ्ट करतील. आम्हाला कोणालाही एकमेकांना पाहता येणार नाही. पूर्ण कुटुंब उध्वस्त होईल माझे. श्याम ला खुप टेंशन आलं. माझा घरात तर २ लहान मुलं आहेत. त्याला लगेच सुचले त्याचा building मध्ये एक फ्लॅट खाली आहे. त्याने लगेच त्याचा मालकाशी संपर्क केला. आणि पुढील काही दिवसांसाठी तो रेंट नी घेतला. त्याचे लागणारे सर्व सामान एका बॅग मध्ये राधिकाला पॅक करायला सांगितले आणि तो तिथे राहायला जात असल्याची कल्पना दिली. "मी आता घरी येणार नाही तुला जे काही हवे असेल ते बाहेरच्या बाहेर देत जाईन आणि डबा घेऊन जात जाईन असे सांगितले. मुलांना तर अजीबात भेटणार नाही. आता आपल्याला असेच काही दिवस काढावे लागतील". हे बोलताना त्याचे आणि ऐकताना राधिकाचे डोळे पाणावले होते. निर्णय खूप कठोर होता पण घेणे तेवढेच आवश्यक होते.
              कित्येक पोलिसांच्या घरात आज असेच वातावरण आहे. आता अनेक लोकांना पोलीस निष्ठूर, दगडाच्या काळजाचे वाटत असतील. पण ते आहेत म्हणून आज आपण आहोत. आपल्या घरात अजून कोरोना ने शिरकाव केलेला नाही कारण कोणीतरी घर दार सोडून त्याचाशी बाहेर लढा देत आहे. हरतह्रेच्या माणसांचा त्यांना सामना करावा लागत आहे. कृपया शासनाच्या नियमांचे पालन करा. कोणासाठी नाही तर त्या २ मुलांसाठी ज्यांनी आपल्या बापाला गेले कित्येक दिवस पहिले नाही. त्या माउलीसाठी जी अशा परिस्थितीत नवऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे. आदेशाचे पालन करूया आणी या महामारीला परतवून लावूया. म्हणजे पोलिसांना, सर्व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना त्यांचा घरी निर्धास्त जाता येईल. आपल्या प्रियजनांन बरोबर वेळ घालवता येईल.
                                                 " जय हिंद ! जय महाराष्ट्र ! "

                            अनुप्रिता पोरे

Post a Comment

أحدث أقدم