बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती;
बारामती तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत ७ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती टॅंकरमुक्त समितीचे समन्वयक व बारामती तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास समन्वय समितीचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर व बारामती पंचायत समितीच्या सभापती नीताताई फरांदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडून 345 कोटी रकमेच्या योजनांना ही प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. बारामती तालुका टॅंकर मुक्तीच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून या योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत करण्यात आलेली होती. त्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय गुलाब राव पाटील व राज्य मंत्री संजय बनसोडे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचीही माहिती होळकर यांनी दिली.
यामध्ये 55 गावे व 421 वाड्या वस्त्यांचा हा आराखडा बनवण्यात आला होता. या योजनेसाठी पाटबंधारे विभाग व महसूल विभाग यांच्याकडील सुमारे 55 एकर जागा साठवन तलाव, जलशुद्धीकरण केंद्र, व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. तसेच नीरा डावा कालवा व खडकवासला कालवा मधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रीतसर परवाना दिला आहे. त्याच बरोबर या सर्व योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाकी, जलशुद्धीकरण केंद्र, वितरण व्यवस्था, उंच जलकुंभ, पंप हाऊस इत्यादी बाबी बरोबर सदरचे योजनेसाठी सौर ऊर्जा द्वारे वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योजना वीज देयका वरील ग्रामपंचायतींचा खर्च कमी होणार आहे.
तालुक्यातील 7 प्रादेशिक योजना मधील सुपे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ५७.९८ कोटी, देऊळगाव रसाळ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ६५.०८ कोटी, कटफळ जैनकवाडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ६४.३८, कोटी,गोजुबावी खराडेवाडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ५१.१५ कोटी, लोणीभापकर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ५७.५८ कोटी, थोपटेवाडी लाटे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २०.७० कोटी, होळ- सस्तेवाडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना२८.२६ कोटी एवढा निधी मंजूर झाले असल्याची माहिती होळकर यांनी दिली.
إرسال تعليق