माळेगाव(प्रतिनिधी):
90 वर्षाच्या आजीने प्रबळ इच्छाशक्ती व मनोधैर्याच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात करून अनेक कोरोनाग्रस्तां समोर आदर्श ठेवला आहे.तिन दिवसात दोन वयोवृद्धांनी कोरोनावर मात केल्याने कोविड सेंटरच्या सर्व स्टाफ वरती कौतुकाचा वर्षांव होत आहे.
राहिबाई जिजाबा कुचेकर (वय-90 वर्ष ढाळेआळी माळेगाव ) या आजीस कोरोनाची लागण झाली.त्या अतिशय थकल्या होत्या.जेवण देखील जात नव्हते.अशी अवस्था असताना ति जगेल की नाही याची देखील शाश्वती नव्हती.अशा स्थितीत माळेगाव येथील कोविड केअर सेंटरमधे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.
सुरवातीला हि आजी काहीच खात नव्हती.गोळ्या खाणं तर दुरची गोष्ट.पण कोविड सेंटरच्या स्टाफने हार मानली नाही.वयोमानानुसार सदर आजी चिडचिड करत होती.ऐकु देखील कमी येत होते.मात्र डाॅक्टर व नर्सनी प्रथम आजीचा विश्वास संपादन केला.सतत संवाद साधून त्यांना बोलते केले.या संवादाने आजीला बरे वाटुन त्या जेवण करु लागल्या.तसेच औषध उपचार देखील घेऊ लागल्या.
प्रेमळ संवादाने आजीच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडु लागला.आजी दहा दिवसांच्या यशस्वी उपचाराने ठणठणीत ब-या झाल्या.आज त्यांना कोविड सेंटर मधुन घरी सोडले.आजीला बरे वाटत असल्याने सोपान कुचेकर,नामदेव कुचेकर या दोन्ही मुलांसह महादेव कुचेकर,सुनिल कुचेकर,विजय चव्हाण या नातुंना आनंद झाला.कोविड सेंटर मधुन बाहेर पडताना कोविडचा स्टाफ नाहिद मणेरी, मंदाकिनी कोकरे,कोमल गायकवाड,शितल भोसले यांनी फुलांचा वर्षाव केला.नातुंनी हार घातला.तर उपस्थित कोरोना रुग्ण व इतरांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
मला काय व्हतयं पोरांनो अजून मला जगायचं. नातुचं लग्न बघायचं..मला रं काय व्हतयं..कोरोना तर किरकोळचं हाया..मला तर शंभरी पार कराचयं
राहिबाई कुचेकर- आजी
खरे तर एवढे वय असलेल्या आजीवर उपचार करणे एक दिव्यच होतं.मात्र आजी सोबत संवाद साधून योग्य उपचार केले.या वयात ही जिद्द व जगण्याच्या ऊर्मीमुळे आजीने कोरोनावर मात केली.
डाॅ. पल्लवी प्रतापराव लोंढे- वैद्यकीय अधिकारी कोविड सेंटर
إرسال تعليق