सोमेश्वरनगर (दि१५): ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी नियमांचे पालन करून ऊस वाहतूक करावी असे प्रतिपादन वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले. सोमेश्वर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या ऊस सुरक्षा वाहतूक सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.
वाहतूक नियमानुसार ड्रायव्हरने वाहनाची कागदपत्रे व लायसन्स जवळ ठेवणे बंधनकारक आहे, ट्रॅक्टर ट्रॉली ला रिफ्लेक्टेड असावेत,वाहनाची लांबी अठरा मीटरपेक्षा जास्त असू नये, वाहनासोबत एक क्लीनर(सहाय्यक) असावा, ट्रॅक्टर ट्रॉली चा वेग ताशी दहा किमी पेक्षा जास्त नसावा, ट्रॅक्टरला कर्णकर्कश स्पीकर नसावा, तसेच वाहनांमध्ये नियमापेक्षा जास्त भार नसावा, यासह कारखान्याने काढलेल्या वाहतूक परिपत्रकानुसार वाहतूकदारांनी उसाची वाहतूक करावी तसेच नियमांचे पालन न केल्यास किंवा त्याचे उल्लंघन केल्यास प्रचलित कायदा व नियमानुसार संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सोमनाथ लांडे यांनी दिला.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर , संचालक सचिन खलाटे, सिद्धार्थ गीते, किशोर भोसले, महेश राणे, विशाल गायकवाड,शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे बाळासो पानसरे, ज्ञानेश्वर सानप, गौतम लोहकरे, सलमान खान यांच्यासह ऊस वाहतूकदार उपस्थित होते.
إرسال تعليق