सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
बारामती तालक्यातील कऱ्हा वागज गावात कऱ्हा नदीवर असलेल्या पुलाचे दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेले आहेत त्यामुळे नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस सुरू आहे. विशेषतः जिरायत भागात पावसाचा चांगलाच जोर होता. त्यामुळे नाझरे जलाशयातून कऱ्हा नदीपात्रात पाण्याचा चांगलाच विसर्ग सुरू होता. शिवाय सर्व ओढे, नाले भरल्याने त्यातून ही मोठ्या प्रमाणात पाणी कऱ्हा नदीत आले. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. त्यातच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याना ढापे टाकल्याने पाणी थोपले गेले. त्यामुळे बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले होते. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडून पानी पुढे सरकले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने नव्याने झालेल्या पुलाच्या दोन्ही बाजूचा भरावा वाहून गेला. अंजनगाव बाजूकडील तर पूर्ण भरावा वाहून गेला तर कऱ्हा वागज बाजू कडील भरवाचा ही बराचसा भाग वाहून गेला. सुदैवाने यावेळी पुलावर कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
हा पुल नदी पलीकडील अंजनगाव, सोनवडी सुपे, जळगाव, दत्तवाडी या भागांना जोडतो. तर दौंड ला जाण्यासाठी सुद्धा या मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे पलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र आठ वर्षापूर्वीच बांधकाम झालेल्या पुलाचा भरावा वाहून गेल्याने पुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे बंधाऱ्यावरील ढापे वेळेत न काढल्याने अनेक लोकांच्या घरात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून मोठे आर्थिक नुकसान आले आहे. त्यामुळे ढापे टाकण्याचे काम असलेल्या ठेकेदारावर व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते वसंत मोरे यांनी दिली

إرسال تعليق