कोऱ्हाळे बुद्रुक-
कोऱ्हाळे बुद्रुक गावातील माळशिकारे वाडी या ठिकाणी मिळणारी स्मशानभूमीची जागा मिळण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ग्रामपंचायत प्रशासन गटातटाचे राजकारण करत चुकीच्या व गैरसोयीच्या ठिकाणी स्मशानभूमी नेण्याचा डाव करत असल्याचे मत येथील रहिवासी शंकर माळशिकारे यांनी व्यक्त केले आहे.
माळशिकारे वाडी येथे स्मशानभूमीची सोय नव्हती. बरेच लोक आपापल्या रानात अंत्यविधी करत. मात्र काही दलित, भूमिहीन शेतमजुरांना अंत्यविधीसाठी जागाच नव्हती. त्यामुळे दहन करण्यासाठी त्यांची फरफट होत असे. याच प्रश्नासाठी मागील वर्षी गावातील अध्यात्मिक सामाजिक कार्यकर्ते अनिल खोमणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते वास्तविक सन 1992 मध्ये तत्कालीन तहसीलदार यांनी पाटबंधारे संशोधन व जलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या चारीच्या पात्रात गट नंबर दोन लगत हिंदू स्मशानभूमीसाठी जागा देऊ केली होती. तसा उल्लेखही फेरफार मध्ये होता मात्र त्यानंतर ही स्मशानभूमीची जागा ग्रामपंचायतीला मिळाली नाही.
अनिल खोमणे यांनी उपोषण केल्यानंतरही स्मशानभूमीची जागा मिळण्याच्या कामाला गती येत नव्हती म्हणून अनिल खोमणे यांनी 14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात ही जागा काढून देण्याची तयारी केली आहे. मात्र त्या ठिकाणच्या रहिवाशी असलेले शंकर माळशिकारे, अनिल शिंदे, संदीप माळशिकारे, तानाजी माळशिकारे संतोष अडागळे व इतर जवळपास 70 ते 80 लोकांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीने सूडबुद्धीने लोकांची गैरसोय होण्यासाठी मुद्दामहून चुकीची जागा निवडली आहे. वास्तविक माळशिकारे वस्ती लगत मुख्यमंत्री सडक योजनेतून पक्का डांबरी रस्ता झाला आहे. रस्त्याशेजारी स्मशानभूमीची जागा मिळणे संयुक्तिक होते मात्र असे न करता ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक पाटबंधारे विभागाला दुसरीकडे अडचणीच्या ठिकाणी जागा मागितली असल्याचा आरोप वरील लोकांनी केला असून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. वास्तविक गट नंबर दोन लगत डांबरी रस्त्याच्या शेजारी स्मशानभूमीची जागा योग्य व संयुक्तिक असतानादेखील ग्रामपंचायतीचा अट्टाहास अडचणीच्या जागी साठी का हा प्रश्न त्या ठिकाणच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे......
ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आम्ही विरोधी गटाचे असल्याने राजकारण करत असून मुद्दाम आमची गैरसोय करू पाहत आहेत असा ही आरोप या लोकांनी केला आहे. मात्र आम्ही आता हा अन्याय सहन करणार नसून पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करणार असून जिल्हा परिषद व जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे शंकर माळशिकारे यांनी सांगितले. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता. ग्रामपंचायतीला क पत्रक प्राप्त झाले असून संबंधित विभागाने जागा निश्चित करून दिल्यावरच पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली आहे .
إرسال تعليق