प्रतिनिधी - सूरज देवकाते
बारामती-:
बारामतीमध्ये कोरोनाने जोरदार शिरकाव केलेला आहे. दिवसेंदिवस बारामतीमध्ये कोरोनाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज एकाच दिवसात १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने बारामतीतील सर्व दुकानांची वेळ सकाळी ९ ते ३ अशी केली आहे. मात्र बारामतीत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर यानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
बारामती शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर एकूणच सर्व प्रशासनाने योग्य खबरदारी व लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केल्याने इतर शहरांच्या तुलनेत बारामती शहरात कोरोनाचा अटकाव झाला होता . नागरिकांनी देखील प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन केले होते . आता मात्र लॉकडाऊन उठवल्याने व शहरातील जवळपास सर्व व्यवहार पूर्ववत झाल्याने शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे . लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बारामती शहरात नागरिकांकडून सोशल दिस्टंसिंग पाळले जात नाही . बारामतीत इतर तालुक्यातील नागरिकांचा अनेक कारणांसाठी व प्रामुख्याने खरेदीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात वावर आहे . याचा परिणाम म्हणूनच आज एकाच दिवसात १८ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आणि हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे . यासाठी बारामतीत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करणे आवश्यक आहे. आणि त्याची योग्य व काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासान तसेच पोलिसांना आवश्यक सूचना द्याव्यात . अशा प्रकारे लॉकडाऊन केल्यानेच बारामतीत नवीन संक्रमणाची साखळी तुटेल आणि बारामती पुन्हा कोरोनामुक्त होईल .
तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील रुग्णालयात आता बेड उपलब्ध होणं कठीण झालं आहे . येत्या काळात बारामतीतच कोविडसाठी स्वतंत्र हॉस्पीटल अथवा एखादा कक्ष तयार करणे अत्यंत आवश्यक आहे . जेणेकरून बारामतीत भविष्यात आढळणारे रुग्णांना बारामतीतच उपचार उपलब्ध होईल व त्यांना पुण्यात जावं लागणार नाही . तसेच बारामतीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील काही ठराविक बेड कोरोनासाठी राखीव ठेवण्यात यावे व ते प्रशासनाने ताब्यात घ्यावेत यासाठी आपण प्रशासनाला आदेश द्यावे अशी मागणी मनसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
Post a Comment